टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 मे 2021 – भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याची मालमत्ता भारतीय बँका विकणार आहेत. त्यांना ब्रिटिश न्यायालयाने तशी रीतसर परवानगी दिली आहे. सध्या उद्योगपती विजय मल्ल्या भारत सोडून लंडनमध्ये आहे.
उद्योगपती विजय मल्ल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिक कर्ज दिले आहे. तसेच इतर बँका देखील आहेत. त्यांच्यासाठी लंडनमधील ब्रिटिश कोर्टाने विजय मल्ल्याच्याविरुद्ध निकाल दिलासादायक आहे.
मल्ल्याच्या संपत्तीवर असलेलं सिक्युरिटी कव्हर हटवण्यास ब्रिटिश कोर्टाने परवानगी दिलीय. त्यामुळे विजय मल्ल्याला विविध बँकांनी मिळून दिलेल्या सुमारे 9000 कोटीच्या कर्जाची व्याजासह झालेली सुमारे 14 हजार कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्याच्या मार्ग मोकळा झालाय.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली भारतातील इतर 12 बँकांनी मिळून कन्सॉर्शियम स्थापन करून त्याअंतर्गत मल्ल्याला सुमारे 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. ते कर्ज बुडवून मल्ल्या लंडनला पळला. विजय मल्ल्याचे कर्ज वसूल करण्यासाठी त्याची संपत्ती विकण्याचा पर्याय या कन्सॉर्शियमकडे होता.
पण, त्याच्या संपत्तीला सिक्युरिटी कव्हर असल्याने बँकाना ती विकून पैसे वसूल करता येत नव्हते, म्हणून भारतीय बँकांच्या कन्सॉर्शियमने ब्रिटिश कोर्टामध्ये यासंबंधी याचिका दाखल केली. त्या खटल्यात कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या कन्सॉर्शियमच्या बाजूने निकाल दिलाय. त्यामुळे या बँका आता त्यांचं 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करून वसूल करू शकणार आहे.
विजय मल्ल्या प्रत्यर्पणासंबंधीचा खटला हरला :
विजय मल्ल्यांचे भारताकडे प्रत्यर्पण करण्यासंबंधीचा हा खटला नव्हता. त्यामुळे त्यांच्या प्रत्यर्पणाबद्दल अजून निश्चित माहिती उपलब्ध नाही. प्रत्यर्पणासंबंधीचा ब्रिटिश न्यायालयातला खटला मल्ल्या हरला आहे. पण, त्या खटल्याचा अंतिम निकाल न्यायालयाने राखून ठेवलाय . त्यामुळे मल्ल्याला कोणत्या दिवशी भारताकडे सोपवलं, जाईल हे निश्चित झालेलं नाही.
बँका आता असे वसूल करणार कर्ज :
स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील कन्सॉर्शियममध्ये एकूण 13 बँका असून त्यात बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, फेडरल बँक, इंडियन ओहरसीज बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि जेएम फायनॅन्शियल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी यांचा समावेश आहे.
यात स्टेट बँक ऑफ इंडियाने 1600 कोटी, पंजाब नॅशनल बँकेनी 800 कोटी व आयडीबीआयने 800 कोटी रुपयांचे कर्ज दिलं होतं. या कन्सॉर्शियमने मल्ल्याला दिलेले सुमारे 9 हजार कोटींचं कर्ज आता 14 हजार कोटींवर पोहोचलं आहे. ब्रिटिश कोर्टाच्या निर्णयानंतर हे कन्सॉर्शियम विजय मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करून पैसे वसूल करणार आहेत.