टिओडी मराठी, दि. 31 मे 2021 – कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी पौष्टिक खाण्यावर आणि पेयावर भर दिला जात आहे. यात ताक किंवा लस्सी, दही यांचाही समावेश होत आहे.
उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून घरी बनणारा पदार्थ म्हणजे, ताक किंवा लस्सी होय. तर, दही हा एक पौष्टीक पदार्थ आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. ज्यांना उन्हाळ्यामध्ये बद्धकोष्टाचा किंवा पोटात उष्णता वाढण्याचा त्रास असेल, त्यांनी दही आणि दह्यापासून बनणारे पदार्थ खावे.
दह्यापासून बनणारी लस्सी किंवा ताक यामुळे वजनही कमी होतं. दह्यात कॅल्शियम, प्रोटीन, झिंकसह व्हिटॅमिन बी 12 अधिक प्रमाणात असते. तसेच दह्यापासून बनणाऱ्या लस्सी व ताक यांचे अनेक फायदे आहेत.
वजन कमी करण्यास लाभदायक :
लस्सी व ताक दोन्ही प्यायल्याने फायदा होतो. त्यात व्हिटॅमीन सी असते. त्यामुळे इम्युनिटी सुधारते. पण, वजन कमी करण्यासाठी लस्सीपेक्षा ताक अधिक उत्तम मानलं जातं. ताकामध्ये कॅलरीज कमी असतात तसेच याशिवाय ताक जेवणाबरोबर घेतल्यास भूक लवकर मिटते.
लस्सीचे फायदे :
पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावे, यामुळे लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्याने यात फॅट आणि कॅलरीजही अधिक असतात. लस्सी मीठ घालूनही बनवतात. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सी मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात.
लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्याने पोटाचे त्रास मिटतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते. अॅसिडीटी झाली असेल तर लस्सी प्यायल्याने फायदा होतो. लस्सी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. घट्ट दह्यात साखर घालून चांगलं फेटून घ्यावे.
ताकाचे फायदे :
उन्हाळ्यात ताक आवडीने प्यायलं जातं. ताकात अधिक प्रमाणात पाणी असते. त्यामुळे पचायला हलकं असतं. जेवणाबरोबर ताक प्यायल्यास भूक भागते. यात खूप कमी कॅलरीज असतात. ताक लस्सीपेक्षा आंबट असतं. त्यामुळं त्यात आम्लीय पदार्थ अधिक असतात.
ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. नियमित प्यायल्यास वजनही कमी होतं. तास सहज बनवता येतं. दह्यात भरपूर पाणी घालून घोटावं, त्यात जीरेपूड, मीठ, पुदीना, कोथिंबीरही टाकून ताक बनवता येते.