मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या मुद्यावरुन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढ़वला आहे. भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासह भाजपचे प्रमुख नेतेमंडळी देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी म्हटलं की, आज ज्या परिस्थितीत ही कार्यकारिणी होते ती दुख:द आहे. होऊ घातलेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होत आहेत. हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केलीय, असा आरोपच देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
पुढे फडणवीसांनी म्हटलं की, ओबीसी आरक्षणाच्या विषयात मोठे षडयंत्र आहे. राज्य सरकारला कोर्टानं सात वेळा तारीख दिली मात्र सरकारनं कार्यवाही पूर्ण केली नाही. नंतर यांच्या खोट्या सबबींवर तारीख देण्यास कोर्टानं नकार दिला, असही फडणवीस म्हणाले. ट्रिपल टेस्ट करा असं कोर्टाने 2019 साली सांगितलं. त्यावेळी ठाकरे सरकार होतं पण सरकारने फार काही केलं नाही. सहा वेळा वेळ मागितली, तरिही कार्यवाही पूर्ण केली नाही, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सातत्यानं महाविकास आघाडीकडून विश्वासघाताचं राजकारण केलं जात आहे. सरकारनं योग्य काळजी न घेताच आकडेवारी सादर केली, असंही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, 2010 साली 50 टक्के आरक्षण देता येणार नाही आणि ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आरक्षण देता येत नाही असं सांगितलेलं. त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. कोर्टात जाणारे कोण आहेत तर एक काँग्रेस आमदारांचा मुलगा तर दुसरा नाना पटोले यांचा कार्यकर्ता. कोर्टात कोण गेलं तर काँग्रेसवाले गेले. पण आम्ही सजग होतो आणि आम्ही तात्काळ केंद्र सरकारकडून जनगणनेचा डेटा मागितला. रातोरात आम्ही अध्यादेश काढला, असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसकडून ओबीसींचा वापर हा दिखाऊपणापुरताच केला गेला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ओबीसी आरक्षणासाठी भाजपनं अनेक आंदोलनं केली. या आरक्षणासाठी भाजप लढतच राहिल. मात्र जोपर्यंत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात निर्णय होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये 27 टक्के तिकिटं ही ओबीसी उमेदवारांनाच देणार असल्याची घोषणा देखील फडणवीस यांनी यावेळी केली.