TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 जून 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलीय. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राजकीय परिस्थितीप्रमाणे तडजोड करणं गरजेचं असतं. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 72 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतलाय. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली झाली असती, असं आजही वाटतं, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

ज्यावेळी ही घटना झाली तेव्हा मतांतरं होती आणि प्रतिमेवर काहीसा परिणाम झाला होता. पण, त्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या मागे उभे राहिले.

अजित पवार देखील आज एकत्रितपणे काम करत आहेत. मागचं सगळं विसरुन सगळे एकत्र काम करताहेत. ज्या घटना घडल्या त्यावर मात करुन एकजीवानीशी काम केलं जातंय, असं जयंत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील आमचे कोल्हापूरवाले आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल जिव्हाळा आहे. परंतु त्यांनी कोल्हापूर सोडून पुण्याला जवळ केलं हे आम्हालाही आवडलं नाही, पुणेकरांनाही आवडलं नाही आणि कोल्हापूरकरांना तर अजिबात आवडलेलं नाही, असा टोला देखील जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटील यांना हाणला आहे.