राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर येथे आज आगमन झालं. जोरदार स्वागत त्यांचं नागपुरात झालं. त्यांच्या समर्थनार्थ आणि स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.
- काल प्रचंड बहुमताने आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकला.
- राज्यात महाविकास आघाडी तयार झाली, तेव्हाच आम्ही सांगितले होते की, अशी अनैसर्गिक आघाडी फार काळ चालत नाही.
- आमचे सरकार गेल्याचे मला दु:ख नव्हते, तर महाराष्ट्र विकासात माघारतोय, याचे दु:ख अधिक होते.
- शेतकर्यांचे, विकासाचे अनेक प्रकल्प थांबले होते. महाविकास आघाडीतील अंतर्विरोध दररोज दिसत होता. शिवसेनेसमोरचे प्रश्न तर मोठे होते. त्यांच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतल्याने अस्वस्थता अधिक होती. यातून शिवसेनेत एक उठाव झाला. ते बंड नाही.त्यातून ते आमच्यासोबत आले आणि आम्ही त्यांना मदत केली.
- आम्ही म्हटले असते, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते. पण, पदाची लालसा आम्हाला नव्हती. उलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करु, हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता.
- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव सुद्धा मीच दिला होता. मी सरकारमध्ये नसेन, असेही ठरले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्त्वाने आग्रह धरल्याने मी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
- विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागास भागावर अन्यायाची मालिका महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाली. त्यामुळे विकासाला, राज्याला प्रगतीला खीळ लावणारे सरकार जाणे, याला प्राधान्य होते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अतिशय सुयोग्य निर्णय घेतला. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पदावर बसविले, त्या पक्षाचा आदेश माझ्यासाठी शीर्षस्थानी आहे.
- काँग्रेसने मोदीजींना ‘चायवाला’ म्हणून हिणवले, त्याच आमच्या पंतप्रधानांनी आज काँग्रेसला पाणी पाजले आहे. त्यामुळे कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले नाही, तर सामान्य माणूसच राज्य करेल. आमची चिंता करू नका. आम्ही एकमेकांना देणारे आहोत, एकमेकांकडून घेणारे नाही !
- मी मुख्यमंत्री झालो नाही, याचे ‘सामना’ला दु:ख होण्याचे कारण नाहीच. त्यामुळे त्यांनी उपहासात्मकच लिहिले आहे. उपहासाला उत्तर द्यायचे नसते.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे.
- पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत. राज्यातील पूरस्थितीकडे आमचे पूर्ण लक्ष आहे.
- आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आम्ही घेतली आहे. मी स्वत: काल रायगड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सातत्याने सर्व यंत्रणांशी संपर्कात आहेत.
- ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून तो सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने बैठक सुद्धा झाली. हा अहवाल वेळेत न्यायालयात सादर करण्याला प्राधान्य आहे. ओबीसी समाजाला त्यांचा हक्क लवकरात लवकर प्राप्त व्हावा, हाच उद्देश आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर समृद्धी महामार्गाचे उदघाटन आम्ही करू.