मुंबई | “ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पक्षाविरोधात जाऊन पाऊल उचललं, त्यांना आम्ही आमच्या दारात प्रवेश देत नाही. पण सगळेच पक्ष किंवा त्यांचे नेते हे शिवसेनेप्रमाणे वागतील, असं नाही. आम्ही जर शरद पवारांच्या जागी असतो तर अजित पवार आणि त्यांच्या गटाला गेटलॉस्ट केलं असतं”, असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या ९ मंत्र्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बाय बी चव्हाण सेंटरला जाऊन रविवारी भेट घेतली. यावेळी तुम्हीही भाजपसोबत चला, असा आग्रह संबंधित नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे धरला. पवारांनी संबंधितांचा प्रस्ताव ऐकून घेऊन काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सरतेशेवटी दादा गटाच्या नेत्यांनी बैठक आटोपती घेतली. या भेटीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असताना संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा” ...“उद्धव ठाकरे शेतीतलं काहीच कळत नव्हतं सांगायचे, मग पवारांनी…”, फडणवीसांची टोलेबाजी”
संजय राऊत म्हणाले, “राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात बंड करून फुटलेले लोक हे अपात्र ठरणारच आहेत. त्यामुळेच अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या दारात उभे होते. मात्र आम्ही शरद पवारांच्या जागी असतो तर अजितदादांना गेट लॉस्ट केलं असतं. पण पवारसाहेबांचा स्वभाव थोडा वेगळा आहे, त्यांच्या पक्षाचं चरित्र थोडं वेगळं आहे. स्वभावामध्ये काही गुण असतात-काही दोष असतात, त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे काम केलं”.
“शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा, त्यांच्या नेत्यांचा स्वभाव वेगळा आहे. शिवसेनेचा स्वभाव लढवय्या आहे. रस्त्यावर उतरुन लढाई करणं, हे आम्ही जाणतो. याउलट राष्ट्रवादीचा स्वभाव संयमी आहे. खूप विचार करुन निर्णय घेतात, नातीगोती जपतात. ज्यांनी पक्षाच्या विरोधात, विचारांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्यासाठी आमची दारे बंद असतात. जर आम्ही काल पवारसाहेबांच्या जागी असतो तर दादांच्या गटाला दारात उभं केलं नसतं किंबहुना गेटलॉस्ट केलं असतं”, असं राऊत म्हणाले.