अहमदनगर :
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. यासाठी त्यांनी चौंडी इथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाचा आणि त्यांना चौंडीत जाण्यापासून रोखण्याच्या घटनेचा संदर्भही दिला आहे.
चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्म ठिकाण असल्याने या जिल्ह्याला त्यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. मधल्या काळात औरंगाबादप्रमाणेच हा मुद्दाही थंड झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर या मुद्द्याने पुन्हा उचल घेतली आहे.
आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतरासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा- नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं.
हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे अहमदनगर हे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे. त्यामुळे आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा? ‘अहिल्यानगर’ नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल, ही अपेक्षा. अन्यथा हा बहुजन जागा झाला आहे आणि संघटीत झाला आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही पडळकर यांनी पत्रात दिला आहे.