टिओडी मराठी, दि. 9 ऑगस्ट 2021 – जागतिक तापमान वाढीच्या संबंधामध्ये संयुक्त राष्ट्रांनी नेमलेल्या समितीने आपला सहावा अहवाल सादर केला आहे. त्यात पर्यावरणाच्या हानी बद्दल गंभीर इशारे दिलेत.
पर्यावरणाचा वेगाने होणारा ऱ्हास आणि जागतिक तापमान वाढीसाठी कार्बन तसेच अन्य घातक वायुचे उर्त्सजन रोखण्यासाठीचे जे उद्दिष्ट दिले आहे. ते साध्य होण्याच्या बाबतीत जे अडथळे निर्माण केलेत ते तातडीने दूर होण्याची गरज आहे, असे सांगण्यात आले आहे.
या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, पृथ्वीच्या सर्वच भागात तापमान वाढीने मोठे नुकसान केलं आहे. जगातील तापमान धोकादायक पद्धतीने वाढत आहे. सन 2030 पर्यंत पृथ्वीचे तापमान 1.5 अंश सेल्सीयसने वाढणार आहे.
समुद्राची पातळी देखील वेगाने वाढत आहे. 1901 ते 1971 या कालावधीत समुद्राची पातळी दरवर्षी 1.3 मिलिमीटर वेगाने वाढत होती. पण, सन 2006 ते 2018 या कालावधीत समुद्राची पातळी सुमारे 3.7 मिलिमीटरने वाढली आहे. कमालीची थंडी तसेच कमालीची उष्णता हे प्रकार पृथ्वीच्या सर्वच ठिकाणी दिसून येताहेत.
शहरांतील घडामोडींमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशी शहरे या प्रक्रियेत हॉटस्पॉट ठरली आहेत. त्यामुळे मोठा पाऊस आणि मोठा दुष्काळ ही संकटे वारंवार उद्भवणार आहे, असा इशाराही या अहवालात दिला आहे.