सोशल मीडिया वरती प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक जण काही हटके व्हिडिओ तयार करत असतात. यातले काही व्हिडिओ पाहण्यासारखे असतात तर काही व्हिडिओमुळे अनेकजण वादाच्या भोवऱ्यात अडकतात. सध्या इंस्टाग्रामवर ( Instagram )दर चार व्हिडिओनंतर जिचा व्हिडिओ येतो ती म्हणजे गौतमी पाटील ( Gautami Patil ). सोशल मीडियावरील ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा. गौतमीच्या डान्सने महाराष्ट्राला वेड लावले. सध्या तिला अनेक कार्यक्रमात लावणी सादर करण्यासाठी देखील बोलावलं जातं. सोशल मीडियाने गौतमीला भरपुर प्रसिद्धी मिळवून दिली. आपला डान्स आणि एक्सप्रेशनने तरुणांना वेड लावणारी गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी लोणी काळभोर येथे झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या कार्यक्रमात लावणीच्या नावाखाली अश्लीलतेचे प्रदर्शन करत अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचल्यामुळे लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर तसेच लावणी कलाकार मेघा घाडगे यांनी गौतमीची चांगलीच कान उघडणी केली होती.
दरम्यान सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असणाऱ्या बेडग येथे गौतमीच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी इतकी जमली होती की, मैदान देखील अपुरं पडलं. मग काय प्रेक्षकांनी जिल्हा परिषद शाळेच्या छतावरती चढून कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न केला तर काहींनी झाडावरती बसून लावणीचा आनंद लुटला. मात्र यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या कौलारू छताचा चुराडा झाला. एवढेच नाही तर याच कार्यक्रमाच्या परिसरात एकाचा संशयास्पद मृत्यू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गर्दीत चेंगराचेंगरीमध्येच या माणसाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज मिरज ग्रामीण पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. दरम्यान ही गौतमी पाटील नेमकी कोण आहे आणि अचानक तिच्या नावाचा एवढा बोलबाला का झालाय हेच आज आपण जाणून घेऊयात…
गौतमी पाटील ही मूळची धुळे जिल्ह्यातील. गौतमीच वय हे 26 वर्ष आहे. धुळ्यातील सिंदखेडा या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गौतमीने अगदी कमी वयात या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. गेली नऊ ते दहा वर्षांपासून गौतमी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. गौतमीने डान्ससाठी कसलंही प्रशिक्षण घेतलेलं नाहीये. इतरांचे डान्स पाहून गौतमी डान्स करायला शिकली असं गौतमी म्हणते. गौतमी पाटीलला लावणी डान्सर म्हणून ओळखलं जातं. अनेक कार्यक्रमात गौतमीला लावणी करण्यासाठी मानधन देऊन बोलवलं जातं. गौतमीचे व्हिडिओ YouTube, instagram, Facebook इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. गौतमी तिच्या डान्स व्हिडिओमुळे सतत चर्चेमध्ये असते. मात्र काही व्हिडिओंमधील डान्स स्टेप्समुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते.