टिओडी मराठी, नाशिक, दि. 12 ऑगस्ट 2021 – नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर ह्या फरार आहेत. या प्रकरणामध्ये शालेय शिक्षण मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. याचा मोठा फटका वैशाली झनकर यांना सहन करावा लागणार आहे. अद्याप त्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्या फरार झाल्या आहेत, असे सांगितलं जात आहे.
डॉ. वैशाली झनकर वीर यांच्या कृत्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. या प्रकरणात वैशाली वीर यांचे सरकारडून निलंबन केलं जाणार आहे, असे समजत आहे. त्यांच्याविरोधात सेवा तरतुदीनुसार शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवला आहे. दुसरीकडे निलंबन प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांना आदेश दिलेत.
डॉ. वैशाली झनकर वीर यांची संपत्ती –
बुधवारी नाशिकमध्ये 8 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महिला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांना अटक केली होती. झनकर यांच्या नावावर शहरातील शिवाजीनगर भागामध्ये, गंगापूररोड, मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट आहेत.
सिन्नरमध्ये 0.57 गुंठे, कल्याण-मिलिंदनगरमध्ये 31.70 गुंठे, 10.8 गुंठे, 40.80 गुंठे, 13.10 गुंठे तर सिन्नर येथे 0.56 गुंठे, 3.41 गुंठे, 22.70 गुंठे, अशी एकूण सुमारे 123.64 गुंठे म्हणजेच सुमारे 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळली आहे. तसेच 40 हजारांची रोख रक्कम आढळली आहे. तर एक होंडा सिटी कार, एक ॲक्टिवा दुचाकी अशी वाहने आहेत.