टिओडी मराठी, मॉस्को, दि. 8 ऑगस्ट 2021 – रशियाच्या सैबेरियामध्ये लागलेल्या वणव्यामुळे काही गावांना धोका निर्माण झाला असून या भागातील रहिवाशांना तातडीने परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले जात आहे.
सबेरियाच्या वायव्येकडील साखा-याकुकतिया या भागातील 10.1 लाख हेक्टरवरील वन क्षेत्रापैकी 93 टक्के वनक्षेत्र या वणव्यामध्ये जळून भस्म झाले आहे. ब्यास-कुएल या गावातील डझनभर घरे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलीत.
या गावांमधील रहिवाशांना स्थानिक कृती दलांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. क्याटल डेरा, सिन्स्क, येडयाल आणि इतर अनेक वस्त्यांजवळही आग लागली.
या भागातील सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. या भागातील तेल पुरवठा प्रकल्पाला या वणव्यापासून वाचवण्यासाठी अधिकारी अथक प्रयत्न करत आहेत.
अलिकडच्या काळात रशियात तापमान वाढ अधिक नोंदवली गेलीय. हे बदल हवामान बदलामुळे झाला असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. वाढत्या तापमानाबरोबर वणवा लागल्यामुळेही ही आग झपाट्याने पसरली.