TOD Marathi

Terror Funding Case : जम्मू कश्मीरमध्ये NIA चे 14 जिल्ह्यांत 45 ठिकाणी छापे !; Healthcare, Education च्या नावाखाली गोळा करत होते निधी

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 8 ऑगस्ट 2021 – जम्मू कश्मीरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) टेरर फंडिगप्रकरणी 14 जिल्ह्यांतील 45 पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकलेत. बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामी संघटनेशी संबधित असलेल्या व्यक्ती आणि संघटनेच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पैशांचा पुरवठा केल्याप्रकरणी एनआयएने जम्मू कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएकडून ही कारवाई केली आहे.

पाकिस्तानला आणि फुटीरतावाद्यांना समर्थन करणाऱ्या जमात-ए-इस्लामी संघटनेवर केंद्र सरकारने 2019 मध्ये पाच वर्षांसाठी बंदी घातलीय. बंदी असतानाही जमात-ए-इस्लामीकडून कारवाया सुरु होत्या.

या कारवाया रोखण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकले आहेत. या करावाईसाठी दिल्लीमधून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एक पथक श्रीनगरमध्ये गेले. त्यांनी शनिवारपासून कारवाई सुरु केली.

श्रीनगर, बडगाम, गंदरबाल, बारामूल्ला, कुपवाड़ा, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियाँ, पुलवामा, कुलगाम, रामबाण, दोडा, किश्तवाड़ आणि राजौरीमध्ये एनआयएने हे छापे टाकलेत.

टेरर फंडिगप्रकरणी एनआयएची ही मोठी करावाई आहे. आरोग्यसेवा व शिक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेच्या मदतीने जमात ए इस्लामीला दुबई आणि तुर्कस्थानकडून पैसे पुरवण्यात येत होते.

त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता. या संघटनेकडून जमात लश्कर, हिजबुल मजाहिद्दीन, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांना निधी पुरवला जात होता, अशी माहिती मिळाल्याने ही कारवाई केल्याचे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दगडफेकी व हिंसाचाराच्या घटना कमी झाल्यात. कश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा दहशतवाद पसरवण्यासाठी संघटनेच्या कारवाया सुरू होत्या.

कश्मीरमधील तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यासाठी संघटनेची गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे एनआयएने ही कारवाई हाती घेतली, आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.