एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे पक्ष चिन्हाच्या बाबतचा निर्णय सोपवला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्ष चिन्ह गोठवत उद्धव ठाकरे यांना मशाल तर एकनाथ शिंदे यांना ढाल-तलवार हे चिन्ह दिलं. (Shinde group got new symbol from Election Commission) या दोन्ही गटांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावाही केला होता. मात्र, निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला.
त्यानंतर छत्रपतींची निशाणी आम्हाला मिळाली, अशी प्रतिक्रिया देत शिंदे गटाने आनंद व्यक्त केला. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी या चिन्हामागचा अर्थही सांगितला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर बोलताना नरेश मस्के म्हणाले की, छत्रपतींची निशाणी आम्हाला मिळाले आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडण्याचा प्रयत्न झाला होता, त्यावर आघात करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यावर वार करण्यासाठी आम्हाला ही तलवार मिळालेली आहे। शोषित, अन्यायग्रस्त त्यांच्या संरक्षणासाठी ढाल ही निशाणी मिळाली आहे. असेही नरेश मस्के म्हणाले. (Naresh Mhaske of Shinde group talks on new Symbol to Shinde group by EC)
तसेच शिवसैनिक हा नेहमी योद्धा असतो, तो योद्धासारखा लढतो. बाळासाहेबांनी सांगितले की तुम्ही योद्धा आहात. अन्यायावर वार करा, आज आम्हाला निशाणी जी मिळाली आहे त्याचा आम्हाला आनंद आहे. बाळासाहेबांचे विचार आम्हाला महाराष्ट्रात पोहोचवायचे आहेत. असेही नरेश मस्के म्हणाले.