मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत कलावती बांदूरकर यांना मोदी सरकारने मदत केल्याची माहिती दिली. पण, यवतमाळ जिल्ह्यातील कलावती या राहुल गांधी घरी आल्यानंतरच शासकीय मदत मिळाल्याचे सांगत आहेत. यावरून कलावती यांना भाजप नव्हे; तर काँग्रेसने मदत केल्याचे स्पष्ट होते, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्याचवेळी अमित शहा यांनी माझ्याविषयी संसदेत खोटी माहिती दिली, त्यांच्यावर पंतप्रधानांनी कारवाई करावी, अशी मागणी केली.
भंडारा आणि गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असलेल्या वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकसभेत कलावती यांच्या अनुषंगाने देशाला खोटी माहिती पुरविली आहे. कलावती यांच्यासह निर्भयाच्या भावाला पायलट करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. केवळ खोटे आरोप करण्यापलीकडे त्यांना काहीही येत नाही. दुसऱ्यांच्या कर्तृत्वावर आपली पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे. नऊ वर्षांच्या काळात कोणतेही काम, विकास केला नाही. सांगण्यासारखे काही उरले नसल्याने खोटेनाटे आरोप केले जात आहेत.
हेही वाचा “ …“मोदी सरकारला फक्त स्तुती ऐकायची आहे”, अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले”
यासंदर्भात त्यांनी मारेगावच्या तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदनही पाठविले आहे. निवेदन देताना काँग्रेस कार्यकर्त्यांची बहुसंख्य उपस्थिती होती. गृहमंत्र्यांनी बुंदेलखंडच्या कलावती यांचा उल्लेख लोकसभेत केला. पण, या कलावती मारेगाव तालुक्यातील जळका येथील असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.