मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा.. चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले. आणि चार पैकी तीन राज्यांचा कल भाजपकडे असल्याचं पाहायला मिळालं. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचं कमळ फुललं आणि तेलंगणात काँग्रेसनं मुसंडी मारली.
छत्तीसगड आणि राजस्थान या दोन राज्यात काँग्रेसला हातची सत्ता गमवावी लागली आणि फक्त तेलंगणात विजय मिळवता आला. तेलंगणात काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेत येत असलं तरी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या सर्व राज्यांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला.
यावेळी एकनाथ शिंदेंनी काँग्रेसला टोला लगावला. “या निवडणुकांना इंडिया आघाडी सेमीफायनल म्हणत होते. आता ही लोकसभेची फायनलच झाली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये देशातली जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. २०२४ ला आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोदीजी तोडतील आणि पुन्हा पंतप्रधान होतील. येत्या निवडणुकीत काँग्रेसचं नामोनिशाण राहणार नाही”
काँग्रेसच्या राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली. पण विदेशात जाऊन भारत तोडो करण्यासाठी भारताची बदनामी ते करत होते. पंतप्रधानांची बदनामी करत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला. त्यांची जागा दाखवली. असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर टीकास्र सोडलं