टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 जून 2021 – भारतामध्ये सापडणाऱ्या डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर हैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस ही अधिक प्रभावी ठरत आहे. ही गोष्ट पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून समोर आलीय.
भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिएंट हा जबाबदार आहे. त्यामुळे भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झालीय. तर बीटा व्हेरिएंट हा पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला होता.
देशातील जवळपास प्रत्येक राज्यामध्ये हा व्हेरिएंट सापडला आहे. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण अधिक आहे. भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असल्याने तो चिंतेचा विषय आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
अद्याप या तीन संस्थांनी केलेला अभ्यास प्रकाशित केलेला नाही. या अभ्यासासाठी कोरोनातून बरे झालेले 20 रुग्ण आणि दोन्ही डोस घेऊन 28 दिवस झालेले 17 लोकांच्या सँपल घेतले होते. कोव्हॅक्सिनची ही लस या दोन व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी आहे, असा दावा या अभ्यासात केला आहे.
भारतामध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूचे जागतिक आरोग्य संघटनेने नामकरण केले आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट ‘कप्पा’ आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतामध्ये सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झालाय.
डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 50 टक्के अधिक वेगाने पसरत असल्याचे यात समोर आलंय. डेल्टा हा व्हेरिएंट भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची संख्या अधिक प्रमाणात वाढली.