TOD Marathi

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेली निवडणूक म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक. ही निवडणूक खूप महत्त्वाची होती. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुरुवातीला भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती, या निवडणुकीच्या दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत कार्यरत होत्या त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर बरेच दिवस त्यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता. त्यासाठी त्यांना कोर्टात जावं लागलं होतं आणि कोर्टाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला होता.

सध्या निकालाचे कल हाती यायला सुरुवात झाली आहे आणि अपेक्षाप्रमाणे ऋतुजा लटके यांनी मतांमध्ये आघाडी घेतली आहे. ऋतुजा लटके यांच्या मतांमध्ये आघाडी असली तरी नोटाला केलेले मतदान देखील लक्षवेधी आहे. ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची होती. या निवडणुकीत भाजप किंवा शिंदे गट आपला उमेदवार देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. मात्र, भाजप आणि शिंदे गटाने भाजपच्या मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहून ऋतुजा लटके यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, अशी विनंती केली होती. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेतली होती, त्यानंतर भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली होती. मात्र त्यानंतरही काही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते त्यामुळे ही निवडणूक पार पडली.

मतमोजणीमध्ये आतापर्यंत ऋतुजा लटके यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. मात्र, त्यांच्यापाठोपाठ अपक्ष उमेदवारांना मागे टाकून नोटाला २९६७ मतं मिळाली आहेत. ऋतुजा लटके यांना आतापर्यंत ११३६१ मते मिळाली आहेत.

भाजपच्या मुरजी पटेल यांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र,मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून ‘नोटा’चा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते.