टिओडी मराठी, पुणे, दि. 21 जून 2021 – पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे, त्यामुळे पुण्यातील जम्बो कोव्हीड रुग्णालय अखेर बंद होणार आहे. कोरोनाची नियंत्रणात आल्यामुळे आता कोव्हिड सेंटरमधील रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर हे रुग्णालय बंद केले जाणार आहे. जम्बो कोव्हिड सेंटर जरी बंद झाले तरी नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही, असेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पुण्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबई पाठोपाठ पुण्यातही सीओईपी कॉलेजच्या ग्राउंडवर जंबो कोव्हीड सेंटर उभारले. दुसऱ्या लाटेत रुग्णांना बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागली तेव्हा पुन्हा एकदा हे रुग्णालय सुरू केलं. मागील काही महिन्यांत साधारण 3000 रुग्णांवर उपचार केले.
आता मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांवरचा भार कमी होत होता. याच पार्श्वभूमीवर जम्बो कोव्हिड सेंटरमधील प्रवेश बंद केले होते. आता पुढच्या ७ ते ८ दिवसांमध्ये हे रुग्णालय बंद होणार आहे.
याबाबत पुणे महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, रुग्णालयाची मुदत 22 जून पर्यंत असली तरीही आम्ही तेथील रुग्णांची परिस्थिती पाहून डिस्चार्ज मिळेपर्यंत हे रुग्णालय सुरू ठेवणार आहे. त्यानंतर ते बंद केले जाईल.
या दरम्यान हे रुग्णालय जरी बंद होणार असलं तरी इतर रुग्णालयांत रुग्ण वाढले तर बेडची सुविधा केली आहे. त्यामुळे जम्बो कोव्हिड सेंटर जरी बंद झाले तरी नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही.