काँग्रेस (Congress) पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात आजवर केवळ सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी यापूर्वी 1939, 1950, 1977, 1997 आणि 2000 मध्ये निवडणुका झाल्या आहेत. आता झालेली निवडणूक तब्बल 22 वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक आहे.
137 वर्षीय काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीत जिंकलेले 80 वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे नवे ‘सरसेनापती’ असणार आहेत. त्यांच्या निमित्त्ताने तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष देशातील सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाला मिळाला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिस्पर्धी शशी थरुर यांचा एकतर्फी पराभव केला आणि ते काँग्रेस अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. थरूर यांनी पराभवाचा स्वीकार करत खर्गे यांना शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसचे नवे अध्यक्ष (Congress New President) मल्लिकार्जुन खर्गे हे 1969 पासुन राजकारणात आहेत. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी भागात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गुलबर्गा येथील नूतन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर येथील शासकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. आपल्या महाविद्यालयीन जीवनात ते विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीसही होते. गुलबर्ग्याच्या सेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतल्यांनंतर त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. 1969 मध्ये ते MKS मील्स एम्प्लॉईज युनियनचे कायदेशीर सल्लागार बनले. त्यानंतर त्यांनी कामगारांसाठी लढा दिला. ते युनायटेड ट्रेड युनियनचे प्रभावी नेते होते.
1969 मध्येच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना गुलबर्गा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केले गेले. पुढे 1972 मध्ये ते पहिल्यांदा कर्नाटकातील गुरुमितकल विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. आणि एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 9 वेळा खर्गे गुरुमितकल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. यादरम्यान त्यांनी विविध खात्यांचे मंत्रीपदही भूषवले. 2005 मध्ये त्यांना कर्नाटक प्रदेश काँग्रेसची जबाबदारी मिळाली होती. 2008 पर्यंत ते या पदावर होते. आणि 2009 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले.
मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू मानले जातात. 2014 मध्ये ते लोकसभेत पक्षाचे नेते झाले. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Elections) त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर काँग्रेसने त्यांना 2020 मध्ये राज्यसभेवर पाठवलं.
मात्र मल्लिकार्जुन खर्गे यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. काँग्रेस स्थापनेपासुन 137 वर्षांच्या इतिहासात सर्वांत वाईट कालखंडातून पक्ष जात आहे. 2024 च्या निवडणुकीचं तगडं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. काँग्रेसमध्ये नव्याने जोश उभारण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी अशी भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे हा प्रतिसाद पाहता तोच प्रतिसाद पक्षाला सक्रीय करून 2024 पर्यंत कायम ठेवण्याचे एक आणखी मोठं आणि तगडं आव्हान मल्लिकार्जुन खर्गे रगएयांच्यासमोर असेल. आपली निर्णय प्रक्रिया स्वतंत्र आहे हे सुद्धा त्यांना कृतीतून सिद्ध करून दाखवावं लागेल.