छत्तीसगड:
छत्तीसगढमध्ये (Chhattisgarh) एका बँक कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह जंगलात जाळण्यात आल्याची खळबळजनक घटना छत्तीसगड राज्यात घडली आहे. छत्तीसगडमधून मिळालेल्या धक्कादायक वृत्तानुसार, राजधानी रायपूरमध्ये (Raipur) एका खासगी बँकेच्या महिला कर्मचाऱ्याची ओडिशात (Odisha) निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या महिलेची ओळख लपवण्यासाठी मारेकऱ्याने मृत मुलीचा मृतदेह देखील जंगलात जाळला . यानंतर पोलिसांनी ओडिशाच्या जंगलातून या मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. त्याचबरोबर या घटनेतील आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. हत्येचा आरोपी, कोलकाता येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तनू कुर्रे (Tanu Kurre) असे मृत बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. छत्तीसगडमधील कोरबा येथे राहणारी तनू कुर्रे ह्या रायपूरमधील एका खासगी बँकेत काम करत होती. जिथे तिची ओळख सचिन अग्रवाल (Sachin Agarwal) या ओरिसा बालंगीर येथील व्यावसायिकाशी झाली. या व्यावसायिकाशी तिची मैत्री नंतर प्रेमात बदलली आणि तीन वर्षांपासून त्यांच्यात चांगले संबंधदेखील होते. सचिन नेहमी कामानिमित्त रायपूरला येत असे. त्याचवेळी तो तनूला, तीच्या नातेवाईकांच्या घरी भेटत असे.
एके दिवशी तनू रायपूरच्या तिच्या पीजीमध्ये गेली नाही, तेव्हा नातेवाईकांनी 22 नोव्हेंबरला त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यादरम्यान सचिनने तनूच्या कुटुंबीयांशी सतत संपर्क साधत होता. इतकंच नाही तर तनू सुखरूप आहे आणि लवकरच लग्न करणार असं आश्वासन देखील तो घरच्यांना देत होता. त्याचा स्क्रिनशॉटही त्यानं कुटुंबीयांना दाखवला, जेणेकरून कुटुंबीयांना तनू जिवंत आहे, असं वाटेल. मात्र सत्य काहीतरी वेगळंच होतं. मिळालेल्या माहितीनुसार, असेही सांगण्यात येत आहे की, बँकेतून बाहेर पडल्यानंतर मृत तनू, आरोपी सचिन अग्रवालसोबत जाताना दिसली. सध्या पोलीसांनी सचिनला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे.