टिओडी मराठी, पुणे, दि. 19 ऑगस्ट 2021 – स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर पुण्यातील औंध गाव परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूर्ती स्थापन करून मंदिराची उभारणी केली होती. येथे मोदींचा अर्धाकृती पुतळा उभारला. आता या मंदिरातून नरेंद्र मोदींचा पुतळा रातोरात हटवला आहे. ही मूर्ती का हटवण्यात आली?, याबाबत भाजप नेते अॅड मधुकर मुसळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिलीय.
मुसळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, मदीर उभारणारे मयुर मुंडे यांची नरेंद्र मोदी यांचे मंदीर उभारण्यापाठीमागे चांगली भावना होती. परंतु, काल मला भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा फोन आला. जिवंत व्यक्तीची अशा प्रकारे मंदिर बांधून पूजा करणे हे भाजपच्या तत्वाला आणि विचारधारेला अनुसरून नसल्याने त्यांनी समजावून सांगितले.
आपल्या मनात पंतप्रधान यांच्याबद्दल असलेल्या भावना रस्त्यावर मंदिर बांधून जाहीररीत्या व्यक्त न करता त्या भावना मनातच ठेवाव्यात. त्यानुसार कार्य करावे.
त्यांचे म्हणणे योग्य असून मयूर मुंडे यांना याविषयी मी कल्पना दिली. त्यानुसार भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरातील मूर्ती काढण्याचा निर्णय घेतला.
आता नरेंद्र मोदी यांची मूर्ती कार्यालयात –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची भावना, आदर असाच कायम राहणार आहे. ती मूर्ती आम्हाला सदैव प्रेरणा देण्यासाठी म्हणून आमच्या कार्यालयात ठेवणार आहोत. तिथे मूर्ती पूजा न करता सर्वांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून आमच्या वैयक्तिक कार्यालयात ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे, असेही मुसळे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.
एवढा केला मंदिरासाठी खर्च –
भाजप कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी परिहार चौकामध्ये नरेंद्र मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरासाठी त्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांचा खर्च केला होता. पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्यामार्फत जयपूर येथून नरेंद्र मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणला होता.