नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा विधानसभा निवडणूका तारखा जाहीर झाल्या आहेत. उत्तर प्रदेश मध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान 7 टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोवा मध्ये 14 फेब्रुवारी ला मतदान एकाच टप्प्यांत होणार आहे तर मणिपूरला 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान आहे. सगळे निकाल 10 मार्च दिवशी जाहीर केले जाणार आहेत. 690 जागांवर या निवडणूका होणार आहेत. यामध्ये युपी मध्ये 403, गोवा मध्ये 40, मणिपूर मध्ये 60,पंजाब मध्ये 70 आणि उत्तराखंड मध्ये 60 जागांवर निवडणूक होईल असे सुशील चंद्रा यांनी सांगितलं आहे. याकरिता 1620 पोलिंग बुथ असणार आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रांपैकी किमान 1 बुथ महिलांकडून सांभाळलेले असेल असे ते म्हणाले.
महिला आणि दिव्यांगांसाठी या निवडणूकांदरम्यान मतदानासाठी विशेष सोय केली जाणार आहे. कोरोना काळात मतदान घेण्याचं मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर असल्याचं सांगण्यात आलं आहे. उमेदवारांना यंदा ऑनलाईन देखील अर्ज दाखल करता येणार आहे. फिजिकल कॉन्टॅक्ट टाळण्यासाठी या पर्यायाचा वापर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, डिसॅबिलिटी असणारे आणि कोविड 19 रूग्ण पोस्टल बॅलेट द्वारा मतदान करू शकणार आहेत.
15 जानेवारी पर्यंत रोड शो, पदयात्रा किंवा फिजिकल रोड शो घेतले जाऊ शकत नाहीत. तसेच निवडणूक निकालानंतरही विजय सार्वजनिक स्वरूपात साजरा करता येणार नाही. रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत रॅली घेता येऊ शकणार नाही. डोअर टू डोअर प्रचारासाठी जाण्यासाठी देखील 5 जणांच्या उपस्थितीची मर्यादा आहे.