TOD Marathi

नांदेड:
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. रात्री साधारण सात ते साडेसातच्या सुमारास या यात्रेचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन होईल. महाराष्ट्रातून 5 जिल्ह्यांमधून ही यात्रा प्रवास करणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसने नांदेड, देगलूरसह सर्व ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी केली आहे. सुरुवातीला तेलंगणा,कर्नाटक महाराष्ट्राच्या वेशिवरील मदनूर याठिकाणी तीन राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेचे जंगी स्वागत करतील. देगलूर येथील शिवाजी चौकातून जवळपास ५० हजार कार्यकर्त्यांच्या जनसमुदायासह हातात मशाल घेऊन राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे मार्गक्रमण करतील. ते गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारा इथे जाणार आहेत.

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील ‘भारत जोडो यात्रेचा’ खरा प्रवास तसा मंगळवारपासून सुरु होईल. यासाठी काँग्रेसचे राज्यभरातील अनेक कार्यकर्ते आणि नेते नांदेडच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत. नांदेडमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या भोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेले खाद्यपदार्थ या भोजनात असणार आहेत. यामध्ये थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, शेवभाजी, वांग्याचे भरीत हा मेन्यू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

भारत जोडो यात्रा ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान म्हणजे 4 दिवस नांदेड जिल्ह्यात असणार आहे. नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर १० नोव्हेंबर रोजी या यात्रेतील राज्यातील पहिली सभा होईल. या सभेला काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते आणि सामाजिक संघटनांचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सहभागाबाबत काहीशी अनिश्चितता वर्तविली जात आहे (There is some uncertainty surrounding the participation of Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party chief Uddhav Thackeray and Shiv Sena leader Aditya Thackeray in Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra). परंतु, पक्षातील अन्य नेते सहभागी होतील, असे उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. महासंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे दौऱ्यावर असल्याने तेही भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

या यात्रेत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहभागी व्हावे, यासाठी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने या दोन्ही नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर हे दोन्ही नेते या यात्रेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या यात्रेत आपण सहभागी होण्याचे अजून ठरले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यातच आदित्य ठाकरे हे सध्या महासंवाद यात्रेवर जाणार असल्याने त्यांच्याही सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.