मुंबई | आजपासून महाराष्ट्र विधीमंडळांचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षातील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून सत्तेत सामील झालेल्या एकनाथ शिंदे व अजित पवार गटांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर हे पहिलंचं अधिवेशन आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते विरोधी बाकांवर तर काही नेते सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर बसलेले दिसले.
यावेळी सभागृहात आपली भूमिका मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जे नेते विरोधी बाकावर बसले आहेत. तेही आमचेच मित्र आहेत. आमचेच भाऊ आहेत. त्यांनाही सांभाळून घेण्याची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं काय सुरू आहे? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “अजितदादांचं आमच्यावर प्रेम असेल म्हणून ते तसं सांगत असतील, पण आम्ही महाविकास आघाडीबरोबरच आहोत,” असं आमदार भुसारा यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा” …शरद पवारांच्या जागी असतो तर अजित दादांना गेट लॉस्ट केलं असतं : संजय राऊत”
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे अजित पवार गटातून अनिल पाटील आणि शरद पवार गटातून जितेंद्र आव्हाड यांनी व्हिप जारी केले आहेत. यावर सुनील भुसारा म्हणाले, “आम्ही जितेंद्र आव्हाडांचाच व्हिप मान्य करणार आहोत. आता आम्ही शरद पवारांबरोबर आहोत, त्यामुळे जी काही कारवाई होईल, ती बघून घेऊ. शरद पवारांची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला पुरोगामी विचारांबरोबर जायचं आहे. त्यामुळे कुणाबरोबर जायचं हा प्रश्नच नाहीये. शरद पवार उद्या विरोधकांच्या बैठकीला बंगळुरूला जाणार आहेत.”