राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नगर जिल्ह्याच्या राजकारणातील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा लढाई रंगायला सुरुवात झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे नवनिर्वाचित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी सोमवारी मागील सरकारच्या काळातील महसूल खात्यातील निर्णयांची चौकशी करण्याचे संकेत दिले होते. अर्थातच त्यांच्या या विधानाचा रोख माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Former Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या दिशेने होता. त्यानंतर आता माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विखे-पाटलांचे हे आव्हान स्वीकारत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
एवढेच नव्हे तर बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांनाही डिवचले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना फार कमी काळासाठी महसूल मंत्रीपद मिळालं आहे. त्या काळात त्यांनी चांगलं काम करावं. त्यात आमच्या कार्यकाळातील कामाची चौकशी करायची तर ती देखील करावी, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. ते सोमवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भाजप खासदार सुजय विखे-पाटील (MP Dr Sujay Vikhe Patil) यांच्या टीकेचीही व्याजासह परतफेड केली. राधाकृष्ण विखे-पाटलांना महसूल मंत्रीपद मिळाल्यानंतर सुजय विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना डिवचले होते.
दोन महसूल मंत्र्यांच्या कामातील फरक दाखवून देऊ, अशा आशायाचे वक्तव्य त्यांनी केले होते. बाळासाहेब थोरात यांनी मात्र या वक्तव्याची फार दखल घेणे टाळले. सुजय विखे-पाटील यांच्या वक्तव्यावर उत्तर देऊन त्यांना महाराष्ट्रात प्रसिद्धी द्यावी असं मला वाटत नाही. जनतेने माझा कारभार पाहिला, आता त्यांचा कारभार जनता पाहील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे-पाटील आगामी काळात खरोखरच महसूल खात्यातील निर्णयांची चौकशी करणार का, हे पाहावे लागेल.
मागील काळात महसूल खात्यामध्ये काय घडले आहे, याची चौकशी करावी लागेल. मात्र, येणाऱ्या काळामध्ये पूर्वीसारखे आरोप होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त सरकार हाच अजेंडा या सरकारचाच आहे, असेही विखे-पाटील यांनी म्हणाले. विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई संदर्भातही भाष्य केले. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असेही विखे-पाटील म्हणाले.