टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 8 जून 2021 – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉनचे उद्योगपती जेफ बेजोस हे पुढील महिन्यात अंतराळाची सैर करणार आहेत. बेजोस आपली कंपनी ‘ब्लू ओरिजिन’च्या पुढच्या महिन्यामध्ये संचालित होणाऱ्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणातून प्रवास करणार आहे. इंस्टाग्रामवर सोमवारी जेफ बेजोस यांनी याबाबत माहिती दिली.
जेफ बेजोस यांनी, ‘त्यांच्यासह त्यांचा भाऊ आणि लिलावातील एक विजेता ब्लू ओरिजिनच्या ‘न्यू शेफर्ड’ स्पेशशिपवर असणार आहेत, असे सांगितले आहे. 20 जुलै 2021 रोजी हे अंतराळ यान उड्डाण भरणार आहे. या यानामधून टेक्सास येथून अंतराळात थोड्या वेळासाठी प्रवास केला जाणार आहे. तसेच 20 जुलै रोजी अपोलो-11 चंद्रावर पोहोचण्याचा वर्धापन दिन साजरा केला जातो.
इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी व आपली कंपनी ब्लू ओरिजिनवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी अॅमेझॉनचं सीईओ पद सोडणार आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे बेजोस यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच म्हटले होते.
जेफ बेजोस यांनी इंस्टाग्रामवर सांगितलं की, ‘पृथ्वीला अंतराळातून पाहणं, तुम्हाला बदलून टाकतं. या ग्रहासोबतचं नातं तुमच्यासोबत बदलून टाकतो. मला या उड्डाणातून प्रवास करण्याची इच्छा आहे. कारण ही एक अशी गोष्ट आहे, जी मला माझ्या आयुष्यामध्ये करायची होती. हे फार रोमांचक असणार आहे. हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.’
न्यू शेफर्ड यानमध्ये सीटसाठी लिलावाची बोली शनिवारी संपलीय. विजेत्या बोलीची किंमत सुमारे 28 लाख डॉलर आहे. ज्यात 143 देशांतील 6000 हून अधिक लोकांचा सहभाग होता. या लिलावाच्या बोलीतून मिळालेली रक्कम ब्लू ओरिजन फाउंडेशनला दान देणार आहे. ज्याचा उपयोग भविष्यात अंतराळातील संशोधनासाठी केला जाणार आहे.