सावंतवाडी : बंडखोर आमदार कारणं एवढी द्यायला लागले आहेत की उद्या सांगतील, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) निळा शर्ट घालतात, म्हणून आम्ही शिवसेना सोडली, असा जबरदस्त टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. सिंधुदुर्ग (Sindhudurg) दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या मतदारसंघात सभाही घेतली. राज्यात दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे. यामध्ये मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण हेच कळत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
‘ईडीच्या भीतीपोटी आणि सत्तेच्या लालसेपोटी गेलेले गद्दार वेगवेगळी कारणं सांगत आहेत. आता आदित्य निळा शर्ट घालतात, म्हणून आम्ही शिवसेना सोडली असं सांगायलाही उद्या हे कमी करणार नाहीत,. कधी सांगतात फंड देत नाहीत, पण अजितदादांनी तर सगळं वाचून दाखवलं, मी तर दोन-तीन वर्षांपेक्षा अधिक फंड पर्यटन खात्याकडून दिला. हा खोटारडेपणा आहे. त्यांच्यावर इतर काही दडपण असतील, त्यासाठी गेले असतील, तर तुम्हाला लखलाभ, आनंदी राहा, आम्ही तुमच्याबद्दल वाईट विचार करणार नाही, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवू नका, एवढेच उपकार करा, अशी विनंतीही आदित्य ठाकरेंनी केली.
ज्या कोकणाने शिवसेनेला अनेक वर्ष आशीर्वाद दिले, त्या जनतेचं प्रेम घेण्यासाठी आलोय, गद्दारी नक्कीच झाली आहे, पण आम्ही जनतेचं प्रेम घेऊन पुढे जाणार आहोत, हीच शिवसेनेची ताकद आहे. ज्यांना तिथे राहायचंय त्यांनी आनंदात राहावं, आमचा काही राग नाही द्वेष नाही, दुःख जरुर आहे ते पाठीत खंजीर खुपसल्याचं, कठीण काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, मात्र परत यायचं असेल तर दरवाजे खुले आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.