TOD Marathi

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party candidate Rituja Latke) या विजयी झाल्या आहेत. लटके यांचा हा विजय अपेक्षितच होता, या निवडणुकीत भाजपने माघार घेतली होती तरी एकूण ७ उमेदवार रिंगणात होते. ६ अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट या निवडणुकीमध्ये जप्त झालं. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “अंधेरी पोटनिवडणुकीतील विजय हा स्व. रमेश लटके यांच्या कार्याचा, शिवसैनिकांच्या जिद्दीचा” असं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट केलं आहे. तसेच एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. आज अंधेरी पोट निवडणुकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटकेजी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धव साहेबांवर, जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे. या विजयातून निर्माण झालेली ऊर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. “हाती घेतली मशाल निष्ठेचा विजय झाला विशाल, हीच मशाल धगधगणार आता संपूर्ण मुंबईभर, महाराष्ट्रभर” असंही शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके (Rituja Latke) यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. हा विजय माझा नाही तर माझे पती रमेश लटके यांचा आहे, असे म्हणत ऋतुजा लटके यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. माझे हे दुःख आहे की मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागत आहे, असं त्या म्हणाल्या.

सर्वप्रथम मी म्हणेन की हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे, त्यांनी त्यांची जी संपूर्ण राजकीय कारकीर्द होती त्यामध्ये जनसेवा केली, विकासकामं केली त्याचीच ही पोचपावती या विजयाच्या रूपाने मिळालेली आहे. मतदारांनी त्याची एक प्रकारे ही केलेली परतफेड आहे, असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.

सोबतच या निवडणुकीत नोटाचा जास्त प्रचार झाल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी (भाजपने) जरी उमेदवारी मागे घेतली होती तरी लोकांना सांगण्यात आलं आणि आपल्याकडे व्हिडिओ क्लिप देखील आल्या आहेत की तुम्ही नोटाला मतदान करा. नोटाचा असा प्रचार होत नसतो, नोटा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही, तेव्हा तुम्ही नोटाचे बटन दाबू शकता, त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी नोटावर का मतदान केलं? असेही ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.