पुण्यातील हाय प्रोफाईल पबवर (excise department took action on high profile pub, bar in Pune) पोलिसांनी कारवाई केली आहे. परवाना देताना पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी 23 पबवर राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. रूफ टॉप बार, हाय प्रोफाईल पबची मागील महिन्याभरात काही पथकांच्या माध्यमातून झाडाझडती करून घेऊन नियमभंग करणाऱ्या पबवर कारवाई करण्यात आली आहे.
शहरात हॉटेल, पब, बार परमिट रूमची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना रात्री दीड पर्यंत परवानगी दिली जाते. मात्र, यानंतरही रात्री उशिरापर्यंत नियम भंग करत पब (Late night parties in Pub and Bar) आणि बार सुरू ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही. गेल्या महिन्यातच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुणे शहरात तपासणी मोहीम राबवत रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या मोठ्या हॉटेल्स आणि पबवर कारवाई केली होती. यानंतर आता आलिशान अशा रूफ टॉप बारवर देखील उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
शहरात उंच अशा व्यावसायिक इमारतींवर आलिशान पद्धतीने रूफ-टॉप बार चालवले जातात. त्यांना परवाना देताना घालून देण्यात आलेले नियम त्यांनी पाळणे अपेक्षित असतं. या अंतर्गत मंजूर नकाशा याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र, अनेक जण या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून व्यवसाय करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. अशाप्रकारे परवाना कक्षाबाहेर अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या शहरातील जवळपास 23 रूफ टॉप बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.