मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर संपूर्ण राज्यासह देशातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं होतं. (CM Ekanath Shinde) यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं (Malavikas Aghadi Government) आणि भाजपनं शिंदे गटाच्या मदतीनं सरकार स्थापन केलं. यानंतर मात्र माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे.
आता यावर शिंदे गट नेमका काय पवित्रा घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेतेपदावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केसरकर म्हणाले की, ज्यावेळी एखादे नेते मुख्यमंत्री असतात, तेव्हा ते सभागृहाचे नेते असतात, ते महाराष्ट्राचे नेते असतात.
त्यामुळे तुम्ही कितीही डाव खेळले तरी आम्ही हटणार नाही. एकनाथ शिंदे आता विधिमंडळाचे नेते बनले आहेत. त्यामुळे त्यांचं छोटं पद गेलं तर त्यामध्ये कमीपणा काय? असा प्रश्नही यावेळी केसरकरांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी काहीही बोललं तरी आम्ही त्यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही. ते आमचे नेते आहेत. त्यांनी बोलावलं तर आम्ही त्याच्याकडे जाऊन चर्चा करु, अशी भूमिका शिंदे गटाची असल्याचे कळते.