देशातील आयआयटी संस्थाही (IIT) आता लवकरच बीएड अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) अंतर्गत आयआयटीमध्ये चार वर्षांचा बॅचलर इन एज्युकेशन (BEd.) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी दिली आहे. सध्या बी.एड. या अभ्यासक्रमाचे शिक्षण विविध शिक्षण महाविद्यालयातून दिले जात आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार याची सुरुवात होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आयआयटी भुवनेश्वरच्या कॅम्पसमध्ये एका केंद्रीय विद्यालयाचे उद्घाटन केले, याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील किंवा देशातील अनेक बीएड महाविद्यालयांची पातळी समाधानकारक नाही, तसेच ‘आम्हाला आमच्या अपेक्षेनुसार शिक्षक मिळत नसल्याचे आढळून आले. आपल्याला चांगले शिक्षक मिळाले नाहीत, तर आपण चांगल्या शिक्षणाची अपेक्षा करू शकत नाही. हे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना चांगले शिक्षण देण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणूनच या वर्षापासून पायलट प्रकल्प म्हणून आयटीईपी सुरू करीत आहोत,’ आगामी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आयआयटी ही सर्वोत्तम संस्था असल्याचेही प्रधान म्हणाले.
‘आयआयटीमधून चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. आयआयटीने भावी शिक्षकांना शिकवलं आणि प्रशिक्षण दिलं तर विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल,’ असे ते पुढे म्हणाले.