मुंबई : अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना ( Shivsena) होती. निवडणुकीची जबाबदारीही शिवसेनेकडेच होती, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी व्यक्त केलं आहे. शनिवारी माळशिरस तालुक्यातील गारवाड येथे पाझर तलावांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी राज्यसभा निवडणूक निकालावर (Rajyasabha Election Result ) प्रतिक्रीया देताना त्यांनी पराभवाचे खापर शिवसेनेच्या माथी मारले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीसोबत ( Maha Vikas aghadi ) असलेल्या पाच ते सहा अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केले नाही. परंतु त्यांची आताच नावं घेणे योग्य होणार नाही, असे सांगत आमदार संजय शिंदे ( MLA Sanjay Shinde ) आणि देवेंद्र भोयर ( MLA Devendra bhoyar ) यांची त्यांनी पाठराखण केली. आम्ही सर्व जण पहिल्या पसंतीच्या मताकडे लक्ष दिले पण दुसऱ्या पसंतीच्या मतांनी आमचा घात केला. आजही पहिल्या पसंतीची १६३ मते महाविकास आघाडी सोबत असून सरकारला कोणताही धोका नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या पराभवानंतर अनेक नेत्यांनी आरोपप्रत्यारोप केले आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडीतील नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. आता जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.