पंढरपूर : उजनीच्या पाण्यावरून सुरु झालेला वाद आता चांगलाच पेटू लागला असून यात आता जातीचे राजकारण देखील होऊ लागले आहे. उजनीचे पाणी बारामती आणि इंदापूरला पळविल्याचा आरोप करत सोलापूर जिल्ह्यातून तीव्र संघर्षाला सुरुवात झाली आहे.
उजनीचे पाणी बारामती लोकसभा मतदारसंघात नेण्यात आले असून याला मंजुरी जलसंपदा मंत्र्यांनी दिली तर निधी अजित पवार यांनी दिला. मात्र याप्रकरणी राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना टार्गेट करून त्यांना हटवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे, असा आरोप धनगर समाजानं केला आहे.
दरम्यान जर भरणे यांना पालकमंत्री पदावरून हटविले तर याची किंमत राष्ट्रवादीला चुकवावी लागणार असून आषाढी पूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाऊल ठेऊ देणार नसल्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे. पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.