मुंबई : अनेक दिवसांपासून मराठी नाट्यनिर्मात्यांना बुक माय शो कडून वारंवार अडथळा येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडे हे प्रकरण आल्यानंतर आता त्यांनी बुक माय शोला निवेदन पाठवले असून या प्रकरणी तोडगा काढण्याची विनंतही केली आहे.
जर तोडगा निघाला नाही मनसे स्टाईलने उत्तर मिळेल, असा इशाराही खोपकरांनी दिला आहे. करोना काळात पूर्णपणे ठप्प झालेला नाट्यव्यवसाय आता पुन्हा कुठे सुरू झाला आहे. नाट्यप्रेमीही आता थिएटरकडे वळू लागले आहेत. अशात बुक माय शो कडून मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं काही निर्मात्यांचं म्हणणं आहे. पैसे वेळेत न मिळणं, नाटकांच्या वेळा तसेच नाट्यगृहांची माहिती योग्यवेळी अपडेट न करणं असे प्रकार बुक माय शोकडून वारंवार होत आहेत. यावरच तोडगा काढण्यासाठी आता मनसे पुढे सरसावली आहे.
तसेच जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावणं, हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?, असा सवालही अमेय खोपकर यांनी यावेळेस विचारला आहे.