मुंबई : उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येण्याआधी सबंध उत्तर भारतीयांची जाहीर माफी राज ठाकरे यांनी मागावी अशी अट भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी घातली असून ही अट फक्त राज ठाकरेंचा फुगवलेला इगो पंक्चर करण्यासाठीच आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात आदेश, फर्मान आणि अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांना प्रत्युत्तर का देत नाहीत, असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आज ज्याप्रकारे भाजप खासदार साधुसंतांना एकत्रित करून शक्तिप्रदर्शन करत आहेत त्यावरून भाजपची राज ठाकरेंबाबत खरी भूमिका पुढे येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक विषयांवर आपलं मत प्रदर्शित करत असतात परंतु राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत त्यांनीही मौन साधण्याची भूमिका स्वीकारली आहे असेही महेश तपासे म्हणाले.
राज ठाकरे आणि भाजप यांच्यात अयोध्या प्रकरणात सध्या जो वाद निर्माण झाला आहे, त्या विषयावर महाराष्ट्रातले भाजप नेते मध्यस्थी करतील असे वाटत नाही. कारण ज्या उद्देशासाठी राज ठाकरे यांना स्क्रिप्ट लिहून दिली होती त्या राजकीय डावाला महाविकास आघाडीने हाणून पाडले आहे आणि म्हणूनच राज ठाकरे व त्यांचा पक्ष एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे, असेही महेश तपासे म्हणाले.
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली तर अयोध्येचा दौरा नक्कीच पूर्ण होईल. परंतु महाराष्ट्रात मराठी माणसासमोर परत राज ठाकरे यांना तोंड उघडता येणार नाही. राज ठाकरेंची अशी राजकीय कोंडी भाजपनेच केली आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.