पुणे: बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी त्यांच्यासमोर नवीन रंगमंदिराच्या रचनेचे सादरीकरण करण्यात आले. यावर सविस्तर चर्चा झाली असून पालकमंत्र्यांनी नवीन बालगंधर्व मंदिराच्या उभारणीसाठी सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच महापालिकेची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणार असून आपल्या बालगंधर्व रंगमंदिराला अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे रंगमंदीर प्राप्त होईल, असा विश्वास माजी महापौर मुरलीधर माहोळ यांनी व्यक्त केला.
पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी पु.ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले. आपली कला सादर करण्याची एकतरी संधी बालगंधर्वला मिळावी हे प्रत्येक कलावंताचे स्वप्न असते. ५४ वर्षांपूर्वी बांधलेल्या बालगंधर्वला नव्याने उभारण्याची, व्यापक करण्याची गरज असल्याचेही लक्षात आले. ही बाब लक्षात घेऊन २०१८ साली मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतुदही केली मात्र कोरोनामुळे दोन वर्षाच्या कालावधीमधे हा विषय काही वेळ बाजूला राहीला, तरीदेखील या विषयाचा पाठपुरावा करत पुण्यातील ज्येष्ठ कलाकार, महापालिकेतील सर्वपक्षीय नेते, मनपा अधिकारी आणि वास्तुविशारदांची या सर्वांची एकत्रित समिती नेमून या विषयावर सर्वांगाने चर्चाही घडवून त्यावर आता निर्णय होणार आहे.
केवळ साडे २२ हजार स्क्वेअर फूटामध्ये उभ्या असणाऱ्या या रंगमंदिराला वाढवून साडे तीन लाख स्क्वेअर फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. आज जेमतेम १०० दुचाकी व २०-२५ चारचाकी वाहनांची पार्किंग क्षमता आहे परंतू नवीन वास्तूमधे ८०० ते ९०० दुचाकी व जवळपास ३५० चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था असणार आहे. कलावंत आणि रसिकांच्या मागण्या लक्षात घेऊन एक ऐवजी आता १०००/५००/३०० इतक्या आसन क्षमतेची तीन नवीन ऑडिटोरियम उभी राहणार आहेत.
आज बालगंधर्व मधे केवळ एक ५०० फुटाचे कलादालन उपलब्ध आहे परंतू ह्याच नव्या वास्तूमधे आता सुसज्ज अशी १० हजार फुटाचे एक आणि प्रत्येकी ५ हजार फुटाची दोन अशी तीन नवीन कलादालने उभारण्यात येणार आहेत. शिवाय यात पु. ल. देशपांडे व ५४ वर्षांच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवासाच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत. पुणेकरांना अभिमान वाटावा अशाच प्रकारचे नवीन बालगंधर्व रंगमंदिर आता उभे राहणार आहे.