औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी घेतलेल्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चिथावणी देणारे भाषण केले यासह अनेक अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनिरीक्षक गजानन इंगळे यांच्या फिर्यादीवरून राज ठाकरे यांच्यासह राजीव जेवलीकर आणि।इतर संयोजक यांच्याविरोधात कलम ११६,११७,१५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी करत आहेत.
तीन तारखेला ईद आहे, त्यांच्या सणामध्ये मला विष कालवायचं नाही. पण ४ मे पासून आम्ही ऐकणार नाही. माझी महाराष्ट्रातील हिंदूंना हात जोडून विनंती आहे की, त्यांनी मशिदींसमोर भोंगा वाजला तर त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असा इशारा राज ठाकरे यांनी सभेदरम्यान दिला होता.
तसेच उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? सुप्रीम कोर्टानंही सांगितलंय की यासाठी परवानगी घ्यावी लागते पण आता कोणीही परवानगी घेतलेली नाही, असंही राज यावेळेस बोलताना म्हणाले.