आयपीएलच्या लिलावाची सर्वांनाच उत्सुकता आहे. तसेच क्रिकेटच्या सर्वच चाहत्यांच्या नजरा या लिलावावर टिकून असल्याचं दिसून येतंय. आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन १२ आणि १३ फ्रेबुवारी रोजी होणार असून, उद्या सकाळी ११ वाजल्यापासून या लिलावाला सुरुवात होईल. यंदाचे ऑक्शन बंगळूरुमध्ये आयोजित करण्यात आले आहे. आयपीएल २०२२ साठी १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली होती यामधील ५९० खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर बोली लावण्यात येणार आहे.
इंडियन प्रिमियर लीग मध्ये यंदा ९०० करोड रुपयांचा बजेट होता. यामधील तब्बल ३८४.५ कोटी रुपये खेळाडूंना संघात घेण्यात आणि खेळाडूंवर संघांनी खर्च केले आहेत. तर आता ५१५.५ करोड रुपये सर्व संघ मिळून खर्च करतील. लिलावात सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे तुमच्या हातात असलेली रक्कम. आयपीएलपूर्वी १० संघांच्या हातात किती करोडोंची रक्कम आहे आणि संघांनी कोणते खेळाडू रिटेन केलेत याची माहिती आता समोर आली आहे. तर जाणून घ्या कोणत्या संघाने किती रुपये खर्च केले आणि कोणत्या संघाच्या हातात किती करोड शिल्लक आहे.
१) मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावापूर्वी रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमरा (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (८ कोटी) आणि कायरन पोलार्ड (६ कोटी) यांना आपल्या संघात रिटेन केले आहे. तर आयपीएलच्या लिलावासाठी MI कडे आता ४८ कोटी रुपये एवढी रक्कम शिल्लक आहे.
२) चेन्नई सुपर किंग्स
चेन्नईच्या संघाने रवींद्र जडेजा (१६ कोटी), महेंद्रसिंग धोनी (१२ कोटी), मोइन अली (८ कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (६ कोटी) यांना आपल्या संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाकडेही ४८ कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे.
३) दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५ कोटी) आणि एनरीच नॉर्टजे (६.५ कोटी) यांना संघात कायम ठेवले असून त्यांच्याकडे ४७.५ कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे.
४) कोलकाता नाइट रायडर्स
कोलकाता नाइट रायडर्सने आंद्रे रसेल (१२ कोटी), वेंकटेश अय्यर (८ कोटी), वरुण चक्रवर्ती (८ कोटी) सुनील नरिन (६ कोटी) यांना संघात कायम ठेवले असून KKR कडे आता ४८ कोटी एवढी रक्कम लिलावासाठी हातामध्ये आहे.
५) पंजाब किंग्स
पंजाब किंग्सच्या संघातून कर्णधार लोकेश राहुल बाहेर पडला आहे. त्यामुळे पंजाबच्या संघाने मयांक अगरवाल (१२ कोटी) आणि अक्षरदीप सिंग (४ कोटी) यांना संघात स्थान दिले आहे, त्यामुळे आयपीएलच्या लिलावासाठी सर्वाधिक ७२ कोटी एवढी रक्कम त्यांच्या हातामध्ये आहे.
६) आरसीबी
रॉयल चॅलेंजर्स बंगगळुरुच्या संघाने आपल्याकडे विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी) आणि मोहम्मद सिराज (७ कोटी) यांना कायम ठेवले आहे, RCB कडे लिलावासाठी ५७ कोटी रुपये शिल्लक आहेत.
७) राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सच्या संघाने कर्णधारप संजू सॅमसन (१४ कोटी), जोस बटलर (१० कोटी) आणि यशस्वी जैस्वाल (४ कोटी) यांना संघात कायम ठेवले आहे, त्यामुळे त्यांच्या हातामध्ये आता ६२ कोटी एवढी रक्कम आहे.
८) सनरायझर्स हैदराबाद
हैदराबादच्या संघाने यावेळी कर्णधार केन विल्यम्ससनला १४ कोटी रुपये देत संघात कायम ठेवले आहे, त्याचबरोबर समद आणि मलिक यांना प्रत्येकी चार कोटी रुपये देत संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आता हैदराबादच्या संघाकडे लिलावासाठी ८ कोटी एवढी रक्कम आहे.
९) लखनौ सुपर जायंट्स
यावर्षी आयपीएलमध्ये लखनौचा संघ पहिल्यांदाच उतरणार आहे. लखनौच्या संघाने यावेळी लोकेश राहुल (१७ कोटी), मार्कस स्टॉइनिस (९.२ कोटी ) आणि रवी बिश्नोई (४ कोटी) यांना संघात स्थान दिले आहे. तर लखनौकडे अजून ५९ कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे.
१०) अहमदाबाद
यावर्षी आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अहमदाबादच्या संघाने आगमन केले आहे. अहमदाबादने हार्दिक पंड्या (१५ कोटी), रशिद खान (१५ कोटी) आणि शुभमन गिल (८ कोटी) यांना संघात रेटन केले असून, त्यांच्याकडे सध्याच्या घडीला ५२ कोटी रुपये शिल्लक आहेत.
आयपीएलच्या लिलावामध्ये काही नवीन नावे करोडोंची कमाई करण्याची शक्यता आहे. तर काही नवीन पदार्पणवीर तसेच काही दिग्गज खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. ईशान किशन, डेविड वॉर्नर, श्रेयस अय्यर, क्विंटन डि कॉक, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट तसेच आणखी काही खेळाडू असतील ज्यांना आपल्या संघात घेण्यासाठी फ्रेंचायझीमध्ये मोठी चढा-ओढ होण्याची शक्यता आहे.