उत्तर प्रदेश: लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हिंसाचाराप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशीष मिश्रा शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकापुढे हजर झाला होता. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची सुमारे ११ तास चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोटारी घुसवून हिंसाचार घडवण्यात आला होता. त्यात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. गुन्ह्यातील आरोपी आशीष ३ ऑक्टोबरच्या हिंसाचारानंतर फरार झाला होता. या सर्व प्रकारानंतर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती आणि उत्तर प्रदेश येथील भाजप सरकारवर दबाव वाढला होता.
सर्वच स्तरावरून या हिंसाचार प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती त्याच सोबत देशभरातील शेतकरी संघटनांनी आरोपी आशीषच्या अटकेची मागणी केली होती. अखेर तो शनिवारी सकाळी पोलिसांपुढे हजर झाला आणि चौकशी नंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.