पुणे: १ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो, याच दिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी म्हणजे १ ऑक्टोबर रोजी पूना जेरियाट्रिक केअर सेंटरमध्ये डिजिटल रूम या संकल्पनेचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला महनगर पालिकेच्या नगरसेविका स्मिता कोंढरे आणि हेल्पएज इंडिया या संस्थेचे प्रतिनिधि राजीव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याच सोबत या उद्घाटनासाठी संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. संतोष कनशेट्टे, सदस्य दिपली कनशेट्टे व चंद्रशेखर ऐनपूरे उपस्थित होते.
पूना जेरियाट्रिक केअर सेंटरमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल जगाशी जोडण्यासाठी डिजिटल रूम ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या रूममध्ये कम्प्युटर, वेब कॅम सह ३२ इंची टीव्ही, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन, प्रोजेक्टर अशी उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या साधानांमुळे ज्येष्ठ नागरिकांना समाजमाध्यमांचा वापर करायला शिकता येईल.
ऑनलाइन वर्तमानपतर वाचणे, आपल्या कुटुंबीयांशी विडियो कॉलद्वारे संवाद साधणे, ऑनलाइन बँकिंग करणे, स्मार्ट फोन हाताळणे अशा अनेक गोष्टी ते इथून करू शकतील. ज्येष्ठ नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सुविधेचा वापर परिसरातील इतर ज्येष्ठ नागरिकांना देखील करता येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार या वर्षी डिजिटल इक्विटी फॉर ऑल एजेस, अशी थीम देण्यात आली आहे. त्या थीमला अनुसरून या वर्षीपासून पूना जेरियाट्रिक केअर सेंटरमध्ये डिजिटल रूम ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.