मुंबई: अभिनेता सोनु सूद कोरोनाच्या संकट काळात लोकांच्या मदतीला पुढे धावून आला. नुकतीच सोनू सूदची दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर काल त्याच्या मुंबईतील कार्यालयात इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्याकडून कारवाई करण्यात आली.
आयकर विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल 20 तास सुरु होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या. या सगळ्यातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमके काय साध्य केले, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
कोरोनाच्या काळात त्याने लोकांच्या मदतीसाठी मोठे काम केले. त्याचे हेच काम पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याने राजकरणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र राजकारणात येण्याची इच्छा नसल्याचे त्याने सांगितेले होते.