TOD Marathi

मुंबई: राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपने राज्यसरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून आज अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचे फोटो ट्वीट करत महावीकस आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या विश्वासघाताच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने नेते-कार्यकर्ते यात सहभागी झाले आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध केला.

भारतीय जनता पार्टी यशापयशाची पर्वा न करता केवळ आणि केवळ ओबीसी समाजाचेच उमेदवार देईल, अशी घोषणा आम्ही यापूर्वीच केली आहे. ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे.’ अशी स्पष्ट भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.