नागपूर : शरद पवार यांनी केलेल्या जमीनदारीच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेस काही जमीनदाराचा पक्ष नाही. काँग्रेसने ज्यांना सत्ता दिली, त्यांनीच काँग्रेसचा घात केला, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
‘काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेश च्या जमीनदारासारखी झालीय. जो आपल्या हवेलीवर उभा राहून सगळी हिरवळ आपलीच आहे, हे सांगतो’ असं म्हणत शरद पवारांनी काँग्रेसला डिवचलं होतं. त्यानंतर पटोले यांनी पलटवार केला आहे. काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिली होती. अनेकांनी तीच जमीन चोरली. त्यामुळेच काँग्रेसची ही अवस्था झाली असावी, असं पवारांना वाटत असावं. देशात भाजपला काँग्रेसच पर्याय आहे. त्यामुळे काँग्रेसचाच पंतप्रधान बनेल, असे पटोले यांनी एका वृत्त वाहिनीला बोलताना म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, मोठ्या नेत्यांना आम्ही काही सांगू शकत नाही. कुणाच्या म्हणण्यानं काही होत नसतं. काँग्रेसचा दबदबा आजही कायम आहे. लोकशाहीत लोक ठरवत असतात, कुण्या नेत्याच्या म्हणण्यानं काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही. २०२४ मध्ये काँग्रेस सत्तेत येईल, असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केलाय.