टिओडी मराठी, मुंबई, 31 ऑगस्ट 2021 -राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर करोनाच्या विरोधामध्ये आहे. करोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगात जी शिस्त आणि नियम सांगितलेत. त्याचे पालन करावे लागेल. केंद्राने या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने २ ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित केले होते. त्यापैकी मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले आहे.
हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. मात्र, करोना निर्बंधासाठीचे नियम मोडून आंदोलने केली जाताहेत. आंदोलन करायचेच असेल तर करोनाविरुद्ध करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.