TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, 1 सप्टेंबर 2021 – सध्या अभियांत्रिकी शिक्षणात नवीन अभ्यासक्रमांचा समावेश होत आहे. नव्या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. मात्र, या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थी वंचित आहेत. ऐन करोनाच्या संकटामध्ये पालकांवर आर्थिक शुल्काचा भार पडत आहे.

तंत्रशिक्षण विभागामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असते. त्यानुसार प्रवेश घेणाऱ्या आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते.

अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांना बहुतांश अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जात असते. परंतु, इतर मागासवर्ग, भटक्‍या जमाती या संवर्गातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, रोबोटिक्‍स, डाटा सायन्स आदी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जात नाही.

आर्टिफिशिअल इंटिलिजन्ससह विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही, हि बाब दोन दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांना निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर यासंदर्भात प्रस्ताव अद्याप झालेला नसून हा प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे, असे सांगत या विषयावर अधिक भाष्य टाळले.

605 विद्यार्थ्यांना फटका –
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या नवीन अभ्यासक्रम शिष्यवृत्ती मिळत नाही, अशी ओरड पालकांतून होत आहे. अशा एकूण 605 अभ्यासक्रमांसाठी इतर मागासवर्ग आणि भटक्‍या जमाती म्हणजेच व्हीजेएनटी संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, अशी माहिती समाजकल्याण विभागातील सूत्रांनी दिली.