टिओडी मराठी, नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021 – केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधामध्ये राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता दहा महिने पूर्ण होत असल्याने 25 सप्टेंबरला भारत बंद पाळण्यात येईल, असा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलाय. हरियाणाच्या नूह इथे किसान महासभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल सिंग यांनी हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीची कोंडी करण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन केले. दिल्लीला पूर्णपणे घेरण्याचे आवाहन आम्ही लवकरच करणार आहोत. सध्या दक्षिण हरियाणामध्ये आम्ही पोहोचलो नाही. पण, लवकरच तेथेही आंदोलनन सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
मुझफ्फरनगर महापंचायतीत पाच सप्टेंबरला आपची उत्तर प्रदेश मोहीम सुरू होणार आहे. प्रत्येक तालुका आणि गावात किसान मोर्चाची शाखा सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले, पाच सप्टेंबरला होणारी मुझफ्फरपूर महापंचायत सर्व देशातील नागरिकांसाठी खुली आहे. मेवातचे शेतकरी उत्तर प्रदेशामध्ये जाऊन सर्व तयारी करतील.
सध्या शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश देणाऱ्या सरकारी तालिबान्यांच्या हातात देश आहे. तुम्ही आमचा उल्लेख खलीस्तानी केलात तर आम्ही तुम्हाला तालिबानी म्हणू. आम्ही पहिला सरकारी तालिबानी शोधला आहे. तो हरियाणा सरकारचा अधिकारी आहे.
भाजप राष्ट्रध्वजाचा सन्मान करत नाही. अलीकडेच कोणीतरी (कल्याणसिंह) वारले त्यावेळी त्यांनी भाजपाचा ध्वज राष्ट्रध्वजावर ठेवला होता, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली आहे.