टिओडी मराठी, दि. 23 ऑगस्ट 2021 – भारिप बहुजन महासंघ आणि अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करून बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भावनिक दिशाभूल करणाऱ्या आणि बाळासाहेबांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेणाऱ्या दीपक केदार या व्यक्तीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार करावी, असे जाहीर सूचना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिल्या आहेत. त्यांनी या जाहीर सूचना वंचित बहुजन आघाडीच्या लेटरहेडद्वारे दिल्या आहेत.
या जाहीर सूचनेमध्ये भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अशोक सोनोने यांनी असे म्हंटले आहे कि, भारिप बहुजन महासंघ पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सूचित करण्यात येते की, दीपक केदार किंवा ऑल इंडिया पँथर सेनेचा भारिप बहुजन महासंघशी कोणताही संबंध नाही.
दीपक केदार हे भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी नाहीत. तरीही दीपक केदार भारिप बहुजन महासंघ आणि अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करून बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भावनिक दिशाभूल करत आहेत व बाळासाहेबांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत आहेत.
अॅड. बाळासाहेब आंबेडकरांचे नाव किंवा फोटो वापरण्यासाठी दीपक केदार यांनी बाळासाहेबांकडून कधीही परवानगी घेतलेली नाही. दीपक केदार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाशी किंवा मोर्चाशी भारिप बहुजन महासंघाचा कोणताही संबंध नाही. त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये किंवा मोर्चात कोणी गेले तर ती त्यांची जबाबदारी राहील पक्षाचा त्याला पाठिंबा नाही.
तसेच बाळासाहेबांच्या नावाचा किंवा फोटोचा दीपक केदार किंवा ऑल इंडिया पँथर सेनेने वापर केल्यास भारिप बहुजन महासंघाच्या स्थानिक जिल्हाध्यक्षांनी त्वरित अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा किंवा नावाचा गैरवापर केल्याची पोलिसात करावी. अशा जाहीर सूचना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अशोक सोनोने यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना केल्या आहेत.