टिओडी मराठी, पुणे, दि. 19 ऑगस्ट 2021 – पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या तीन कर्मचार्यांसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाच जणांना अटक केलीय.
याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी महापालिकेत छापा घातला. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्षाच्या स्वीय सहायकाच्या केबिनमध्ये ८ लाखांहून अधिक बेकायदा रक्कम आढळून आली.
या कारवाईनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने अध्यक्ष आणि स्वीय सहायक यांच्या घरावर छापे टाकले असून ही कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती.
स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लिपिक आणि स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भिमराव कांबळे अशी पाच जणांची नवे आहेत.
या पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
महापालिकेच्या जागेत होडिंग उभारण्यासाठी भरलेल्या २८ निविदा मंजूर झाल्यानंतर त्याचे वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी प्रत्येकी २ टक्के लाच मागण्यात आली होती.
त्यापैकी १ लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तेथील लिपिक विजय चावरिया आणि राजेंद्र शिंदे, शिपाई अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.