टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 ऑगस्ट 2021 – आज सकाळी 75 व्या स्वातंत्र्यादिनानिम्मित मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण समारंभ सुरु होता. हा ध्वजारोहण समारंभ संपताच मंत्रालयाच्या परिसरात राज्यातील एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण संपवून निघाले होते. तेव्हाच मंत्रालयासमोर या शेतकऱ्याने अंगावर रॉकेल टाकत शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहनाचा प्रयत्न करणारा शेतकरी जळगावचा असून सुनील गुजर असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे.
मका आणि सोयाबीन व्यवहारात आडकाठी होत आहे, असे या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच यातून या शेतकऱ्याने आज मंत्रालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे, असे सांगितलं जात आहे. परिस्थितीचं गांभिर्य पाहून उपस्थित पोलिसांनी त्या शेतकऱ्याला रोखलं आणि पुढील अनर्थ टळला
संयम आणि शिस्तीचे पालन करुया –
आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करूया. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार आहे, असा सर्वजण मिळून निश्चय करुया. यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केलं आहे.
मंत्रालय प्रांगणात आयोजित राष्ट्र ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.