टिओडी मराठी, औरंगाबाद, दि. 13 ऑगस्ट 2021 – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पराभवासाठी भाजप नेत्यांना जबाबदार धरत सडेतोड टीका केली होती. या टिकेला भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत खैरे हे स्वत:ला भागवतराव कराडांपेक्षा मोठा नेता म्हणवतात. पण, खैरे हे भागवत कराड यांची बरोबरी कधीच करु शकत नाहीत. चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद शहर खिळखिळे केले आहे. या शहराची त्यांनी वाताहत केली आहे, अशी टीका प्रशांत बंब यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयामध्ये बसून पैसे वाटले, त्यामुळे माझा पराभव झाला. जावयाला पुढे करून दानवेंनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत आहे, अशी टीका खैरे यांनी केली होती.
यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर देखील टीका केली. कराड यांना मीच नगरसेवक केलं, मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असे खैरे म्हणाले. मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावाही खैरे यांनी केला आहे.
यावर भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा समाचार घेत त्यांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद शहराचा विकास केला नाही. तर, त्यांनी हे शहर भकास केलं आहे, हे शहर त्यांनी खिळखिळं केलं आहे.
चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद शहरावर सुमारे 20 वर्षे प्रतिनिधित्व केलं मात्र, यात त्यांनी विकासाकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी याबाबत विकासाची लिस्ट द्यावी. श्रेय लाटत आहेत. मी याला नगरसेवक केला, याला मी मोठं केलं, असं ते बोलत आहेत.
मात्र, त्यांनी वास्तवात काही केलेलं नाही. आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची खासदार भागवतराव कराड यांच्याशी बरोबरी होणार नाही. सध्या एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलीलही खैरेंपेक्षा चांगले खासदार आहेत, असेही वक्तव्य भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलं आहे.